Marathi Book Review : तीन हजार टाके - सुधा मूर्ती

पुस्तकाचे नाव  तीन हजार टाके

मूळ लेखक - सुधा मूर्ती

अनुवाद - लिना सोहोनी

प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस

वर्ग  अनुवादित अनुभवकथन

पृष्ठसंख्या  १५२

भाषा  मराठी

Marathi Book Review

तीन हजार टाके : सुधा मूर्ती

मागच्या आठवड्यात सुधा मूर्ती यांचं तीन हजार टाके हे पुस्तक वाचून झालं. मूर्ती हे आडनाव कानी पडलं की आपल्या डोक्यात येतं ते पहिलं नाव म्हणजे - इन्फोसिस. आणि त्यातल्या त्यात सुधा मूर्ती यांचं नाव ऐकलं की आठवते ती समाजसेवा. सुधा मूर्ती या इन्फोसिस फाउंडेशन च्या चेअरमन आहेत. इन्फोसिस फाउंडेशन ही एक समाजसेवा करणारी संस्था आहे. समाजसेवा म्हणजे रोज नवे प्रस्ताव, रोज नवीन गाठीभेटी, रोज नवनवीन माणसं, आणि रोज वेगवेगळे अनुभव हे आलेच - अर्थात चांगले आणि वाईट दोन्ही सुद्धा. तर ह्याच अनुभवांचं कथन सुधा मूर्ती यांनी 'तीन हजार टाके' या पुस्तकातून आपल्यासमोर केलं आहे.

या पुस्तका मध्ये सुधाजींनी एकूण ११ अनुभव कथेच्या स्वरूपात लिहिले आहेत. इतक्या सहज, सुंदर व नेमक्या शब्दांत सुधाजींनी आपले अनुभव वाचकांसमोर मांडले आहेत की पुस्तक वाचून झाल्यानंतर मला तर वाटलं की आपण जणू ११ चित्रपटच पाहिले. (आता काहींना वाटेल मी अतिशयोक्ती करतोय. पण एकदा तुम्ही स्वतः वाचून पाहा आणि मग तुम्हीच मला म्हणाल की आकाश तू खरंच बोलत होता).

अनुभव कथनाची सुरुवात सुधाजींनी त्यांच्या सर्वात पहिल्या अनुभवापासूनच केली. इथून पुढच्या आयुष्यात समाजसेवा करायचं ठरवल्यानंतर पहिल्यांदाच घराच्या बाहेर पडून देवदासी स्त्रीयांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवायच्या व त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी जमेल ती सर्व मदत करायची असं त्यांनी ठरवलं होतं. समस्या जाणून घेण्यासाठी सुधाजींनी त्या स्त्रियांसोबत संवाद साधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्या स्त्रिया काही सुधाजींना त्यांच्या समस्या सांगायला तयार न्हवत्या. कारण, सुधाजी न्युज रिपोर्टर आहेत की काय अशी शंका त्यांच्या मनात होती. त्यांनी एकदा सुधाजींच्या अंगावर  टोमॅटो भिरकावून त्यांना घरी पाठवलं. या घटनेमुळे सुधाजींचा आत्मविश्वास कमी झाला. म्हणून, पुढच्या वेळेस सुधाजी आपल्या वडिलांना सोबत घेऊन गेल्या. वडिलांनी त्या सर्व स्त्रियांना समजवल्यानंतर त्यांना खात्री पटली व त्या स्त्रियांनी त्यांच्या समस्या सुधाजींना सांगितल्या. त्यांच्या समस्येवर उत्तरं शोधली गेली. त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणला. काही वर्षांनी ह्याच स्त्रियांनी मिळून एक पतसंस्था उघडली व पहिल्या वर्धापन दिनाला सुधाजींना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले. पतसंस्थेत सभासद असलेल्या प्रत्येक स्त्रीने मिळून थोडी थोडी कलाकुसर करून तीन हजार टाके असलेली एक गोधडी सुधाजींना भेट म्हणून देण्यात आली. सुधाजी म्हणतात, "मला मिळालेल्या भेटीपैकी ही सर्वात सुंदर भेटवस्तू आहे." कदाचित ह्याच कारणामुळे या पुस्तकाचं नाव ही तीन हजार टाके ठेवण्यात आलं असावं. ही कथा वाचून झाल्यानंतर जर दुसरी कोणती कथा वाचताना माझ्या अंगावर काटे आले तर ती कथा म्हणजे - अलिखित आयुष्य. महाराष्ट्र- कर्नाटकच्या सीमेवर चंदगड नावाचं एक गाव आहे. त्या गावात एका तरुण डॉक्टरांची बदली झाली. गावभोवती सर्वबाजूंनी घनदाट जंगल होतं. कधी कधी इंग्रज अधिकारी तिथे शिकारीसाठी यायचे. त्यांच्या सोयीसाठी ते आरोग्यकेंद्र उघडलं गेलं होतं. पण गावकरी मात्र कधी त्या आरोग्यकेंद्रात उपचारासाठी यायचे नाहीत. आजूबाजूला घनदाट जंगल असल्याने तिथे वाघ, साप वगैरे गावात सुद्धा बिनदास्त वावरायचे. एके रात्री अचानक आरोग्य केंद्राच्या दारावर जोरदार थाप पडली. अंगावर गोधडी व हातात काट्या घेऊन आलेली चार पाच माणसं जबरदस्तीने डॉक्टर साहेबांना त्यांच्यासोबत शेतातल्या झोपडीत घेऊन गेली. झोपडीत एक गरोदर मुलगी होती अर्थात लग्न न झालेली. तिचं बाळंतपण करायचं असल्याचं डॉक्टरला सांगितलं गेलं. पण डॉक्टरांना बाळंतपण कसं करायचं हे माहिती न्हवतं. त्या चार माणसांचा आग्रह फक्त बाईला वाचवण्याचा होता पण सुदैवाने दोघेही वाचले. परंतु तिच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला. त्या मुलीला भीती वाटत होती की ते लोक ह्या जन्मलेल्या मुलीला मारून टाकतील व तिला ही मारहाण करतील. या कथेच्या सुरुवातीलाच असं वाटतं इतकी वाईट परिस्थिती कोणावर ही ओढवू नये, पण कथेच्या शेवटी मात्र आपल्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.  तिसरी मला आवडलेली कथा म्हणजे सुधाजी त्यांच्या लंडन मध्ये राहणाऱ्या दोन नातींना महाभारतातील दोन गोष्टी सांगतात आणि दुसऱ्या दिवशी त्या कथा मुलींच्या लक्षात आहेत की नाही हे पाहण्यासाठी नातींना कथा सांगायला लावतात. त्यांच्या नातींनी कथेचं आधुनिकीकरण इतकं सुंदर केलंय की बस्स. त्यांच्या कल्पनाशक्ती को 'तोह हम मान गये जनाब' - इतकं सुंदर ! आता कथेचं आधुनिकीकरण केलं म्हणजे नेमकं काय केलं ? आर. एच. च्या कथेत त्या दोघी मायलेकीचं काय झालं असेल ? या प्रशांची उत्तरं शोधण्यासाठी तुम्हाला पुस्तकच वाचायला हवं. पण एवढं मात्र नक्की की प्रत्येक कथा वेगळी असून काही हलक्याफुलक्या, काही माणसांच्या वेदना सांगणाऱ्या तर काही त्यांचे संघर्ष सांगणाऱ्या या कथा आहेत. प्रत्येक कथा आपल्याला खूप काही शिकवून जाते!

मी तर तुम्हाला सर्वांना सुधा मूर्ती यांचं 'तीन हजार टाके' हे पुस्तक आवर्जून वाचायला सांगेन. Three Thousand Stiches - हे मूळ पुस्तक इंग्रजी भाषेत असून लीना सोहोनी यांनी मराठीमध्ये या पुस्तकाचं अनुवादन केलेलं आहे.

धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या