Marathi Book Review चिअर्स : व.पू. काळे


पुस्तकाचे नाव चिअर्स

लेखक - व पु काळे

प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाऊस

वर्ग लेख संग्रह

पृष्ठसंख्या १५०

भाषा मराठी

Marathi Book Review

चिअर्स : व.पू. काळे

    चिअर्स हे पुस्तक वसंत पुरुषोत्तम काळे यांनी लिहिलेलं आहे, ज्यांना आपण व. पु. काळे या नावाने ओळखतो. साधारणतः, दोन मित्र जेव्हा दारूने भरलेले ग्लास एकमेकांच्या ग्लासावर आदळतात तेव्हा आपण 'चिअर्स' असं म्हणतो. पण व. पु. ची 'चिअर्स' ची व्याख्या काहीशी निराळी आहे. हे पुस्तक वाचताना, त्यांची चिअर्स ची व्याख्या आपल्याला कळते. या पुस्तकात व. पु. आपल्याला त्यांच्या आवडीच्या १६ व्यक्तीबरोबर आपली ओळख करून देतात. जस जसं आपण पुस्तक वाचत जातो तस तशी आपली ओळख वाढत जाते आणि त्या व्यक्ती आपल्याला पण आवडायला लागतात. याचं सगळं श्रेय व. पु. यांच्या लेखन शैलीला जातं. व. पु. नेहमी सध्या व सोप्या भाषेत लिहितात म्हणून त्यांनी वर्णविलेले पात्र व व्यक्ती आपल्याला जवळचे वाटताट व भावतात. हीच त्यांच्या लिखाणाची खास ओळख आहे.

    पुस्तकासाठी व. पू. नी त्यांच्या आवडीच्या १६ व्यक्तींची विचारपूर्वक निवड केली आहे, असे जाणवते. या १६ व्यक्तींमध्ये आपल्याला कवीपासून बालकलाकार, फॉटोग्राफर, लेखक, डॉक्टर, जादूगारांपर्यंत विविध क्षेत्रातील विविध स्वभावाच्या व्यक्ती भेटतात. या व्यक्तीबरोबर व. पू. ची झालेली पहिली भेट, त्यांच्यासोबतचे अविस्मरणीय किस्से, रंगतदार गप्पा तसेच त्यांच्याकडून मिळालेली अनमोल शिकवण, विचार ह्यांबद्दल व. पू. नी लिहिलेलं आहे. सर्व व्यक्तीपैकी आपल्याला अण्णा, भाऊसाहेब, भावेअण्णा, डॉ. श्रीकांत, टी. टी. यांच्याबद्दल वाचताना आपल्यालाही काही वेळासाठी वाटून जातं - ही मंडळी आपल्याला पण भेटली असती तर किती भारी झालं असतं. आणि मग, त्या व्यक्तींना भेटता नाही आलं, याचं दु:ख चरचरत राहतं. याव्यतिरिक्त, व. पू. नी आपल्यासाठी एका सरप्राइजचा समावेश देखील या पुस्तकात केला आहे. ते सर्प्राइज म्हणजे या १६ आवडत्या व्यक्तींमध्ये सौ. काळे या देखील आहेत. चिअर्स या पुस्तकाबद्दल उल्हासच्या  (या पुस्तकातील एक पात्र) भाषेत सांगायचं झालं तर.., वाचनालयात 'व. पू.'चं चिअर्स हे पुस्तक सापडलं की पहिला पेग घेतल्यासारखा वाटतो. वपूच्या मागच्या पुस्तकाच्या आठवणी, त्यातील कथा व पात्रांची उजळणी, ही अवस्था दुसऱ्या पेग सारखी असते. मग आपण पुस्तक हातात घेतो. पहिलं पान उघडून वाचायला घेतलं की इतकी एक्साईटमेंट येते की, तिसरा पेग कधी हातात येतो कळत नाही. आपण सर्व वपूना प्रत्येक पानावर भेटलेलो असतो. एकदा वाचन सुरू झालं की पेग्ज मोजायचे नाहीत. आणि शेवटचं पान वाचून झाल्यापासून पुढचं पुस्तक हातात घेईपर्यंत मागं उरतो तो 'हँगओव्हर'!

हे सुद्धा तुम्हाला वाचायला आवडेल - 

दाद - पू. ल. देशपांडे

    आपल्या आयुष्याच्या प्रवासात आपल्याला -  'कितने अंजान लोग मिल जाते हैं, उन में से कुछ लोग भूल जाते हैं, कुछ याद रह जाते हैं !' व. पु. नी या पुस्तकात, याच याद राहणाऱ्या लोकांबद्दलच लिहिलं आहे. वरती म्हंटल्याप्रमाणे, जसं जसं आपण त्यांना ओळखत जातो तसं तसं ते आपल्याला आवडत जातात. प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काही शिकायला भेटतं. मग तो त्यांचा साधेपणा असो, किंवा समाजासाठी खूप काही नाही पण थोडसं तरी करण्याची इच्छा. याशिवाय देखील आपल्याला अनेक गोष्टी प्रत्येक व्यक्तीकडून शिकायला भेटतात. हे पुस्तक वाचताना व. पु. आपल्याला प्रत्येक व्यक्तीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन देतात, तसेच माणुसप्रेमी, माणुसवेडा होण्यासाठी आपल्याला प्रेरित करतात. याने आपल्यामध्ये एक सकारात्मक बदल झालेला आपल्याला जाणवतो - जसा मला जाणवला.

    शेवटी या पुस्तकाबद्दल इतकंच सांगेन - आधी 'चिअर्स' म्हंटल्यानंतर दारूचे ग्लास आठवायचे यापुढे 'व. पु.' आठवतील! तुम्ही पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला पण असंच वाटेल, अगदी नक्की!

धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.

Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या