पुस्तकाचे नाव : ईश्वर भक्ती, अनुकंपा, व सेवाभाव यांची साक्षात मूर्ती पुण्यश्लोक मदर तेरेसा
लेखिका : इंद्रायणी सावकार
प्रकाशक : रिया पब्लिकेशन्स
वर्ग : जीवन चरित्र
पृष्ठे : २२४
भाषा : मराठी
Marathi Book Review
ईश्वर भक्ती, अनुकंपा, व सेवाभाव यांची साक्षात मूर्ती पुण्यश्लोक मदर तेरेसा - इंद्रायणी सावकार
मदर तेरेसा आपल्या सर्वांच्याच परिचयाच्या आहेत. त्यांच्या सेवाकार्याबद्दल देखील आपल्याला तुटपुंजी माहिती आहे. इंद्रायणी सावकार यांनी लिहिलेले 'पुण्यश्लोक मदर तेरेसा' हे पुस्तक आपल्याला सेंट मदर तेरेसा यांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल माहिती देते. मदर तेरेसा यांच्या चरित्राचा अभ्यास करून जो निष्कर्ष लेखिकेने काढला तो त्यांनी जसाच्या तसा ह्या पुस्तकात मांडला आहे.
जन्माने अल्बेनियन आहे
नागरिकत्वाने मी भारतीय आहे
माझी उर्मी समस्त जगासाठी आहे
माझे हृदय पूर्णपणे येशूच्या स्वाधीन आहे
- मदर तेरेसा
मदर तेरेसांचे वरील उद्गार वाचून आपल्याला संपूर्ण पुस्तक वाचण्याची उत्सुकता निर्माण होते. हे पुस्तक वाचताना आपल्याला मदर टेरेसांचा येशू वर असलेला गाढ विश्वास, भक्ती, श्रद्धा वारंवार दिसून येते. लॉरेटो ऑर्डरचा खडतर अभ्यासक्रम पूर्ण करून भारतासारख्या विकसनशील देशात येऊन मदर तेरेसांनी त्यांच्या सेवाकार्याला सुरुवात केली. मदर तेरेसांनी पीडितांसाठी, मरणासन्न लोकांसाठी, कुष्ठरोग्यांसाठी मिशनरीज ऑफ चॅरिटी ही संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला. परंतु लॉरेटो ऑर्डर सोडून स्वतःची संस्था स्थापन करण्याची परवानगी मिळवण्यासाठी त्यांना बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना खूप वेळा विनंती, अर्ज करावे लागले. त्यासाठी मदर तेरेसांना खूप काळ प्रतीक्षा करावी लागली. अश्या प्रसंगी मदर टेरेसांची मनस्थिती, जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्वाचं - संयम लेखिकेने अतियश सुंदररित्या आपल्यासमोर मांडला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्वतःची संस्था स्थापन करण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्यांनी काही काळ बोटावर मोजण्या इतक्या सिस्टर्स व स्वयंसेवकांना सोबत घेऊन कोलकत्ता या शहरात काम केले. मरणासन्न अवस्थेतील लोक, पीडित, अनाथ व अत्यंत गरीब असलेल्या लोकांची मदर तेरेसा व त्यांच्यासोबतच्या काही सिस्टर्स यांनी आनंदाने सेवा केली. कुष्ठरोगी, अनाथ, अपंग, गरीब विद्यार्थी आशा लोकांसाठी मदर टेरेसांनी विविध उपक्रम, योजना राबल्या. त्यांच्यासाठी शाळा, शिवणकाम, सुतारकाम यांसारख्या केंद्रांची स्थापना करून त्यांना स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांचं हे सेवाकार्यपाहुन लोकांनी देखील संस्थेला आर्थिक व अन्न-धान्याच्या स्वरूपात मदत केली. काहीच दिवसात मदर तेरेसा यांचे कार्य प्रसिद्धीच्या झोतात आले. प्रसार माध्यमातून त्यांच्या कार्याचा बातम्या संबंध जगभरात पोहचल्या. या कारणामुळे मदर तेरेसांचे कार्य फक्त स्थानिक पातळीवर मर्यादित न राहता जागतिक पातळीवर जाऊन पोहचले. विविध देशात त्यांच्या संस्थेच्या शाखा उघडल्या गेल्या व सेवाकार्य विस्तारत गेले. भूकंप, युद्धजन्य परिस्थिती आशा प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत मदर तेरेसांनी विविध देशात जाऊन शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न केले तसेच आपत्कालीनग्रस्तांना मदत केली. मदर तेरेसांकडे ना पैसा होता ना राहण्यासाठी घर होते, संस्थेच्या काही सिस्टर्स ना घेऊन त्यांनी सेवाकार्य जागतिक पातळीवर पोहचवले. सेवाकार्य व धर्मप्रसार करताना त्यांच्यावर कधी फुले उधळली गेली तर कधी चिखल उडवले गेले. मदर तेरेसांना जगातील सर्वोच्च पुरस्कार 'नोबेल' व अनेक जागतिक दर्जाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. बी.बी.सी. या आंतरराष्ट्रीय न्यूज चॅनेल वर त्यांची मुलाखती झाली. त्यांच्या जीवनावर आधारित शॉर्ट फिल्म्स निघाल्या. त्याचबरोबर मदर तेरेसांवर अनेकांनी टीकास्त्रे सोडली. या दोन्ही परिस्थिती मदर तेरेसा कायम विनम्र, शांत, अविचल राहिल्या. त्यांनी कधीही प्रसिद्धी मिळावी, जगाने त्यांचे कौतुक करावे यासाठी कधीही काम केले नाही. खडतर वेळेत आपण कसे वागले पाहिजे याचं उत्तम उदाहरण म्हणून आपण या प्रसंगाकडे पाहून त्यातून शिकू शकतो.
- ह्या पोस्ट सुद्धा तुम्हाला आवडतील -
- एका अवलीयचा प्रपंच - अंजली ठाकूर
- तीन हजार टाके - सुधा मूर्ती
इंद्रायणी सावकार जींनी या पुस्तकातून 'अग्निस ते सेंट मदर तेरेसा' हा प्रवास सुरेख रित्या मांडला आहे. वळणावळणाचा हा प्रवास आपल्याला भारावून टाकणारा आहे. सुरुवातीला कंटाळवाणं वाटणारं पुस्तक जशी जशी पानं पलटत जाऊ तसं तसं Interesting वाटत जातं. हे पुस्तक वाचल्यानंतर मदर तेरेसांबद्दल आपल्याला वाटणारा आदर अधिकाधिक बळावत जातो. ज्यांना सेवाकार्य करण्याची आवड आहे, त्यांनी जरूर हे पुस्तक वाचावं.
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
0 टिप्पण्या