पुस्तकाचे नाव : दंवातले आकाश
लेखक : विलास पाटील
प्रकाशक : चंद्रकला प्रकाशन
वर्ग : कथासंग्रह
पृष्ठे : १६०
भाषा : मराठी
Marathi Book Review
दंवातले आकाश - विलास पाटील
'दंवातले आकाश' हे पुस्तक विलास पाटील यांनी लिहिलं आहे. प्रस्तुत पुस्तक हे कथासंग्रह असून, आपल्या दैनंदिन जीवनात घडणारे नानाविविध प्रसंग विलासजींनी आपल्या भिंगातून दाखवले आहेत. कदाचित त्याचमुळे मुखपृष्ठावर पांढऱ्याशुभ्र आकाशाखाली हिरव्यागार गावतावर असलेल्या दंवबिंदू च्या समोर भिंग धरलेली आपल्याला दिसून येते. साधी व सोपी भाषा ही विलासजींच्या लिखाणाची खास ओळख ! म्हणूनच आपल्याला त्यांचं पुस्तक अधिक प्रिय वाटतं. वादळ वाटा, लोक काय म्हणतील ?, गारुड, दोघी, खोल खोल आत कुठेतरी, कागदी नावा ही विलासजींची प्रसिद्ध पुस्तके आहेत.
या पुस्तकात एकूण २४ कथा आहेत. दैनंदिन आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगांवर आधारित या सर्व कथा आहेत.
विनोदी लेखकाची चेष्टा करणं म्हणजे न्हाव्याची दाढी करण्यासारखं आहे. विनोदी लेखकानं दुसऱ्याला गंभीर व्हा म्हणून सांगावं म्हणजे... तोतऱ्यानं दुसऱ्याला नीट बोल म्हणून सांगण्यासारखं आहे.
कटू सत्याला विनोदाचं आवरण घातलं की निंबोणीच्या आडून डोकावणाऱ्या चांदोबच रूप त्याला येतं.
अश्या प्रकारच्या हसायला भाग पडणाऱ्या वाक्यांनी या पुस्तकाची सुरुवात होते.
आपल्या सर्वांच्याच आयुष्यात काही फसवणूक करणारी माणसं आपल्याला भेटतं असतात. ती कधी व कशी आपल्या गंडवून जातात याचा आपल्याला पत्ता सुद्धा लागत नाही. विलासजींनी मात्र 'दुनिया झुकती हैं' या कथे मध्ये ही माणसं आपल्या डोळ्यात कशी माती घालून जातात याचं मजेशीर वर्णन केले आहे.
तुम्हाला पुस्तक वाचून काय मिळतं ? हा प्रश्न आजपर्यंत आपल्याला अनेकांनी विचारला असेल. हो ना ? आपण पुस्तकं का व कशासाठी वाचावं याचं किमान शब्दात कमाल उत्तर विलासजींनी ' हरवलेले डोळे' च्या शेवटच्या उताऱ्यात दिलं आहे.
हस्यमय झालेली सुरुवात पुढे पुढे आपण भारावून, आश्चर्यचकित होऊन जाऊ, अश्या कथा या पुस्तकात आपल्याला वाचण्यास मिळतात. उदारणार्थ 'गोष्ट एका पावसाळ्यातली'च कथा बघा ना. एक मुलगा रेल्वेच्या रुळाखाली जीव देणार असतो. तेवढयात त्याला रामजीभाई नावाचा एक माणूस जीव देण्यापासून त्याला थांबवतो. त्या मुलाला रामजीभाई जगायचं कशासाठी ? समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात. परंतू, रामजीभाईचं स्वतःचं संपूर्ण कुटुंब - बायको आणि दोन्ही मुलं महाभयंकर जलप्रलयात वाहून गेलेली असतात. मग रामजीभाई जगतो कोणासाठी व का ? हा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल. ह्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी तुम्हाला पुस्तक वाचण्याची गरज आहे.
याशिवाय बालपण, लग्न, दुःख, मृत्यू यांसारख्या कथा देखील वाचनीय आहे. मला ह्या पुस्तकातली अजून एक कथा खूप आवडली ती कथा एका साधुबाबा ची आहे. पुढे या साधुबाबाचं गावातल्या एका विधवा महिलेबरोबर अनैतिक संबंध होतात व नंतर त्यांचं लग्न होतं. त्याला गावकऱ्यांचा विरोध असतो. पण लग्न करण्यामागचं कारण आपल्याला अनपेक्षित पण वेगळा दृष्टीकोन देऊन जाणारं आहे.
एकूण १६० पानांचं पुस्तक वाचताना आपल्याला कायम पुढे काय घडणार याची उत्सुकता मनाला लागून राहते. सहज व सोप्या भाषेत लेखकाने आपल्याला दैनंदिन जीवनात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टीकोन या पुस्तकाच्या माध्यमातून दिला आहे. विविध विषयांवरील कथेतल्या प्रत्येक प्रसंगातून आपल्याला काही ना काही नवीन शिकायला भेटते. विलासजीचं लिखाण हे विचारपूर्ण आहे परंतु गंभीर नाही.
यांसारख्या अगदी हलक्या फुलक्या शब्दांच्या मदतीने आर्त आशय विलासजी देऊन जातात. विलासजींच्या वर्णनात्मक शैलीचे आपल्याला वेळोवेळी दर्शन घडते. विलासजी कोणत्या प्रसंगाची तुलना कोणासोबत करतील याचा काही नेम नाही. विलासजींची कल्पनाशक्ती विलक्षण आहे हे त्यांनी केलेल्या तुलनात्मक लिखाणावरून आपल्याला लगेच कळून येते. एकदा हातात घेतलेलं पुस्तक आपल्याला हातातून सोडवत नाही एवढं नक्की. विलासजीचं 'दंवातले आकाश' हा कथासंग्रह माझ्या आवडत्या कथासंग्रहांपैकी अग्रक्रमावर असलेला कथासंग्रह आहे. तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला ही नक्की आवडेल याची खात्री आहे.
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
0 टिप्पण्या