लिमलेटची गोळी - सलिल कुलकर्णी

गीत: 'लिमलेटची गोळी'

गीत लेखन: अश्विनी शेंडे, सलील कुलकर्णी

गायक: सलील कुलकर्णी

    सलील कुलकर्णी सरांच्या 'लिमलेटची गोळी' या गाण्याने मला पुन्हा शाळेत नेलं. माझ्या खूप जवळच्या मित्रासोबतच्या आठवणी जाग्या केल्या. आताही आम्ही सोबत आहोत पण त्यावेळची मज्जा काही औरच होती. 

    इयत्ता नववी! इयत्ता नववी मध्ये मी आणि माझा मित्र - संकल्प एकत्र आलो. एकत्र  येण्याआधी आम्ही एकमेकांसोबत नऊ शब्दसुद्धा बोललो नहवतो. तो भेटण्याआधी मित्र बरेच होते पण ज्याच्या खांद्यावर हात टाकून 'हा आपला यार आहे' असं म्हणायला भाग पाडणारा कोणी भेटला न्हवता. संकया भेटला तेव्हा नववीची सहामाही परीक्षा उलटून गेली असावी. एके दिवशी मॅडमने संकयाची जागा बदलून माझ्या बाजूला म्हणजेच भिंतीकडेच्या रांगेत पहिल्या बेंचवर, बसवलं. बस्स.. एवढंच आठवतं! पुढे कधी, केव्हा, कसे 'यार' झालो? याबद्दल काही आठवत नाही. दहावीला योगागाने दोघे पुन्हा बेंचपार्टनर झालो. ह्यावेळेस मात्र 'बॅकबेंचर' होतो - मधली रांग शेवटून दूसरा बेंच.

    दररोज डब्बा सुट्टी मध्ये बेंचवर बसून एकत्र डब्बा खायचो. डब्बा खाऊन झाल्यानंतर कधीतरी शाळेतल्या कॅन्टीन मध्ये जाऊन, मोजून 2 रुपयांचे चणे-फुटाणे खायचो. कधी संकयाने आईकडून दोन रुपये आणलेले असायचे तर कधी मी, तर कधी-कधी दोघं एक-एक रुपया घेऊन यायचो. पैसे कोणीही आणले तरी चणे फुटाणे दोघे एकत्र खायचो. विशेष म्हणजे 'तुला कमी-मला जास्त' यांसारख्या गोष्टींवरून न भांडता! दोन रुपयांमध्ये अगदी थोडेच चणे फुटाणे यायचे, त्यातसुद्धा दोन भाग. त्यामुळे, प्रत्येकाच्या वाट्याला बोटांवर मोजण्याइतके चणे-फुटाणे आलेले असायचे. त्या थोड्याश्या चण्या-फुटाण्यांनी पोट कधीच भरायचं नाही. पण, मन मात्र नेहमी भरल्यासारखं वाटायचं.

    हल्ली, दहा-वीस-तीस रुपयांचे चणे-फुटाणे खाल्ल्यानंतर कदाचित पोट भरतं पण मन भरत नाही. कारण, सरांनी गायलेल्या गाण्यातील ओळींप्रमाणे खरंच त्यावेळी -

'सारे किती साधे सोपे ,किती खरे होते

थोडे थोडे होते तरी पुरे होते'

सलील सरांच हे गाणं आणि ही पोस्ट मी माझ्या मित्राला समर्पित करतो.

धन्यवाद!
तुम्हाला हा लेख उपयुक्त वाटल्यास - ही पोस्ट तुमच्या मित्रांसोबत Share करा.
Book Review | Articles | Story | Poems | Shayari वाचण्यासाठी -
Subscribe (Free): www.akashvaanee.blogspot.com

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या